आईलाही द्यावं कधी माहेरपण
कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..
उठू दे तिला कधी सर्वात शेवटी
पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी
नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
फार नाही, पुरेल तिला मदत जराशी
लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
आई राहून सासरी लेकीला माहेर देते
पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
मग आईला कुठलं माहेरपण?
तिला ओळखणारं तिचंच अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?
आईलाही हवा असेल कधी विसावा
वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
Share from UR Whatsapp, Click Icon below
मी ही कविता instagram ला सादर करू इच्छाते. आपले नाव घोषित करून. परवानगी असल्यास उत्तर द्यावे. आपले पूर्ण नाव ही सांगावे म्हणजे कवितेचे क्रेडिट आपल्याला देता येईल
ReplyDelete